कोरोना इलाजा बाबतीत या 14 गोष्टी

prevent coronavirus infection

Post Source From whatapp post

माहितीदाते :
AP  -डॉ अभिषेक पिंप्राळेकर (फिजिशियन)
DW  -डॉ दिनेश वाघ ( फुफ्फुस /छाती रोग तज्ज्ञ )
RM  -डॉ रुपाली माळी (सूक्ष्मजीव / विषाणूतज्ञ) 
प्रश्नकर्ते, शब्दांकन आणि लेखन : SF -डॉ समीर फुटाणे ( न्यूरोसर्जन )

१) एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला असेल अशी शंका केव्हा घ्यावी ?

DW – ताप (आणि सतत येणारा आणि वाढणारा), अंगदुखी , थकवा , चव आणि वास लक्षात न येणे, सुका खोकला , धाप लागल्या सारखे होणे. ऑक्सिमीटर असल्यास त्यावर आधी-पेक्षा ऑक्सिजनची मात्रा कमी होणे. इत्यादी लक्षणे असल्यास सद्यपरिस्थिती मध्ये कोरोनाची शक्यता गृहीत धरावी आणि त्वरित डॉ ना भेटावे. 

२) पण ही लक्षणे तर इतर  नेहमीचे आजार जसे डेंगू, मलेरिया , लघवीचे इन्फेकशन मध्ये पण येऊ शकतात ?

AP – अगदी खरे आहे . पण सध्या ज्या आजाराचा जगभर प्रादुर्भाव / साथ आहे , संख्याशास्त्रा (स्टॅटिस्टिकली ) नुसार त्याची शक्यता सगळ्यात जास्त असते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून, इतर निदानाचा प्रथम विचार करणे संयुक्तिक ठरणार नाही. कोरोना नसल्याचे पक्के झाल्यास, दुसऱ्या आजारांचा जरूर विचार केला जातो. साथी -नुसार हे निदान बदलत जातात. 

३) बरं! मग अश्या पेशंटच्या निदानासाठी कोरोनाची टेस्ट पुरेशी आहे का ?

AP – नाही. पेशंटची लक्षणे , ऑक्सिजन लेवल , छातीचा सिटी स्कॅन (HRCT Chest ) किंवा एक्स रे आणि स्वाब (कोरोना) टेस्ट या तिहेरी गोष्टींचा विचार करून निदान केले जाते. छातीचा सिटी स्कॅन, यामध्ये अतिशय महत्वाचा आहे कारण कोरोना च्या न्यूमोनियाची अगदी विशिष्ट लक्षणे सिटी स्कॅनवर खूप लवकर आणि खात्रीलायक रित्या दिसून येतात. 

नुसता विषाणू (वायरस ) शोधणे नाही, तर त्याने होणारे शरीरा वरील विशिष्ट परिणाम याचे समीकरण सोडवणे यात महत्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे घडलेला गुन्हा आणि ते करू शकणारा गुन्हेगार ह्या दोघांचा मेळ घालणं गरजेचं आहे.

काही व्यक्तींची टेस्ट पॉजिटीव्ह आलेली आहे पण त्याना काहीच लक्षणे नाहीत असे असल्यास त्यांना asymptomatic carrier म्हटले जाते. याचे कारण म्हणजे नैसर्गिक रित्या यांच्या शरीराच्या इम्युनिटीने विषाणू नेस्तनाबूत केला असू शकतो. पण यांना स्वतःला त्रास नसला तरी इतरांना त्यांच्या-पासून संसर्ग होऊ शकतो. 

४) कोरोना swab test कशी केली जाते आणि त्याचा अर्थ काय ?

RM – स्वाब स्टिक द्वारे नाक आणि घशातील स्त्राव जमा केले जातात. त्या स्रावामध्ये विषाणू आहे किंवा नाही यासाठी,  RT-PCR या अद्ययावत तंत्रज्ञानाने विषाणूच्या गाभ्याचा (nucleus, RNA) चा शोध घेतला जातो. ही प्रक्रिया संगणकीकृत असते. ह्या प्रक्रियेला साधारतः बारा ते चोवीस तास लागतात . सध्या निदानासाठी RT-PCR किंवा TruNAT सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाते.

त्याशिवाय विषाणूच्या कवचावरील प्रतिजनाचा (अँटीजेन) शोध सुद्धा काही रॅपिड कार्ड टेस्ट द्वारे केला जाऊ शकतो. अँटीजेन टेस्ट पॉजिटीव्ह असल्यास निदान लगेच पक्के करता येऊ शकते.  विषाणूसंसर्गामुळे शरीरात प्रतिद्रव्य (अँटीबॉडी) तयार होतं, हे सुद्धा कार्ड टेस्ट द्वारे तपासता येऊ शकते. त्यामुळे संसर्ग होऊन गेला आहे किंवा नाही याबद्दल अनुमान करता येते.

या सगळ्या तपासण्याची गरज वेगवेगळ्या परिस्थिती मध्ये पडते. मुख्य म्हणजे प्रत्येक टेस्टला स्वतःच्या मर्यादा आहेत, कुठलीच टेस्ट पूर्णतः फुल-प्रूफ नसते.

५) ओके ! स्वाब टेस्ट निगेटिव्ह असेल तर याचा अर्थ काय? म्हणजे कोरोना नाहीये असा होतो का ?

RM – स्वाब टेस्ट (RTPCR ) आजाराच्या कुठल्या दिवशी घेतली गेली आहे , विषाणुसंख्या (viral  load ) किती आहे , स्वाब व्यवस्थित जागेवरून (नाकातील किंवा घशातील ) घेतला गेला आहे का , लॅब पर्यंत नेणारी कोल्ड चेन / शीतसाखळी (म्हणजे ट्रान्सपोर्ट ) व्यवस्थित आहे का इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून आहे. आजारपणाच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा ही टेस्ट साधारणतः फक्त साठ टक्के रुग्णामध्ये पॉजिटीव्ह येते.

नंतर च्या आठवड्यात तर त्याहून कमी. टेस्ट ज्या भागातून घेतली गेली तेव्हा तिथे विषाणुसंख्या किती आहे त्यावरही रिपोर्ट अवलंबून असतो. त्यामुळे एखाद्या लॅब मध्ये निगेटिव्ह आलेली टेस्ट दुसरीकडे पॉझिटिव येऊ शकते. किंवा उलटे सुद्धा होऊ शकते. यात काहीही आश्चर्याचे नाही. शीतसाखळीत डिफेक्ट आल्यास सुद्धा रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो.

संख्याशास्त्रानुसार (statistics) प्रत्येक टेस्टला काही सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफ़िसिटी असते. त्यामुळे निदानासाठी  टेस्ट च्या पॉजिटीव्ह रिपोर्टचा दुराग्रह धरणे अ-शास्त्रीय आहे. आधी सांगितल्या प्रमाणे पेशंटची लक्षणे ह्यात सगळ्यात महत्वाची आहे.  शिवाय छातीचा सिटी स्कॅन सुद्धा महत्वाचा पुरावा देऊ शकतो.

कित्येक रुग्ण अतिगंभीर परिस्थितीला पोहचून सुद्धा त्यांचे स्वाब टेस्ट निगेटिव्ह राहिलेले आहेत. केवळ टेस्ट निगेटिव्ह आहे म्हणून कोरोना नाही (इतर पुरावे असताना) असे म्हणणे म्हणजे ढगाळ वातावरणात ऊन नसेल तर आज सूर्यच उगवला नाही असे म्हणण्यासारखे आहे.

६) बरं ! टेस्ट पॉझिटिव आली किंवा नाही आली आणि संयुक्तिक लक्षणे आणि सिटी स्कॅन वगैरे आल्यावर, मग पुढे काय केले जाते ?

DW – पेशंटचे वय, त्याला आधीपासून असलेल्या व्याधी (डायबेटीस , दमा , उच्च रक्तदाब इ ) , सध्याच्या त्रासाची तीव्रता (म्हणजे दम लागणे किंवा न उतरणारा ताप, हृदयगती ), ऑक्सिजन लेवल, सिटी स्कॅनवर दिसत असलेला फुफ्फुसांचा डॅमेज अशा अनेक गोष्टींचा हिशोब लावून रुग्णांची तीन भागात वर्गवारी करण्यात येते.

ज्यांना फार तीव्र लक्षणे  नाहीत अशा  व्यक्तींना सौम्य (mild) गटात  ठेवलं जातं . ज्यांना तीव्र लक्षणे आहेत, ऑक्सिजन पुरवठा लागतोय असे पेशंट  मध्यम (moderate) गटात मोडतात. त्याहीपेक्षा तीव्र लक्षणे आणि ऑक्सिजनवर पूर्णतः अवलंबून असणाऱ्यांची तीव्र (severe) गटात वर्गवारी करण्यात येते. या वर्गवारी नुसार इलाज-क्रम (ट्रीटमेंट प्रोटोकॉल) ठरतो.

७) सगळ्या  रुग्णांना ऍडमिट केले जाते का ?

DW  – नाही. सगळ्यांनाच  ऍडमिशनची गरज नसते. बहुतांशी रुग्ण सौम्य गटात येतात. सौम्य गटातील रुग्णांना शक्यतो होम -आयसोलेशन (गृह -विलगीकरण) चा सल्ला दिला जातो. अर्थात ज्यांच्याकडे स्वतंत्र खोली ( वेगळ्या संडास/बाथरूम सकट) असेल , ऑक्सिमीटर वापरण्याची सुविधा आणि लागल्यास तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करता येत असेल तरच होम -आयसोलेशन वापरावे.

अन्यथा अशा रुग्णांना कोविड केअर सेन्टर (CCC) मध्ये भरती करता येऊ शकते. बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे असतात आणि त्यांची प्रगती पण समाधानकारक असते. सुदैवाने बऱ्याचशा रुग्णांना फारसा काही त्रास होत नाही.

पण पहिले दोन आठवडे त्यांच्या-पासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका फार असतो म्हणून साधारणतः पंधरा दिवसाचे विलगीकरण केले जाते. त्यानंतर हा धोका नगण्य होतो. म्हणून वैयक्तिक त्रास  किंवा धोका फारसा नसेल तरीही विलगीकरणाची प्रक्रिया पार पाडावी लागते. म्हणून कोविड केअर सेन्टर (CCC) मधील रुग्ण पूर्णतः निरोगी भासतात.

अर्थात इतर दोन्हीही गटातील पेशंटना ऍडमिट करणे अत्यावश्यक असते. सौम्य गटातील  काही व्यक्तींची प्रकृती खराब होऊन त्यांना सुद्धा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याची गरज केव्हाही लागू शकते.

८) कोविड -१९ हा विषाणू शरीरात गेल्यावर नक्की काय होतं ?

AP -हा विषाणू श्वासावाटे फुफ्फुसामध्ये स्थिरावतो आणि तिथल्या पेशींना नुकसान करू लागतो. फुफ्फुस हवे तून आलेला ऑक्सिजन शरीरामध्ये शोषून घेण्याचे काम करते.  विषाणूबाधीत पेशी योग्य तेवढा ऑक्सिजन शोषून घेऊ शकत नाही. ऑक्सिजनची मात्रा कमी होऊ लागते म्हणून रुग्णाला धाप लागते.

विषाणूची एन्ट्री होताच शरीराची प्रतिकार क्षमता (Immune System ) लगेच कार्यान्वित होते. पण विषाणू आणि इम्युनिटी च्या युद्धात शरीराचं पण नुकसान व्हायला लागतं (innocent  bystander effect ). त्यामुळे फुफ्फुसांवर सूज येणे , रक्ताच्या गुठळ्या बनण्याचं प्रमाण वाढणे इ.

ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा कमी झाला की सगळ्या अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ लागते. काही तरुण व्यक्तींमध्ये हृदयाचे स्नायू शिथिल होऊ लागतात (Viral myocarditis). काही रुग्णामध्ये स्वतःची इम्युनिटी अति प्रमाणात काम करते त्यामुळे सायटोकाईन स्टॉर्म ( विषाणू-विरोधक स्त्रावाचा अतिरेक) येतो. ही सगळ्यात बिकट परिस्थिती असते.

या सगळ्या प्रक्रिये मुळे धाप लागणे, हृदय गती वाढणे, ताप चढत जाणे , लघवी कमी  होणे,छातीत दुखणे इत्यादी लक्षणांना सुरुवात होते.

सुदैवाने बव्हंशी सुदृढ रुग्णांचे शरीर या सगळ्या प्रकाराला यशस्वीरीत्या सामोरे जाते आणि दोनेक आठवड्यात त्यांची सुधारणा होऊ लागते. परंतु काही वयस्कर किंवा दमा किंवा डायबेटीस , कँसर, अतिस्थूल (obese) असलेले रुग्ण हे अंतर्गत विषाणू-विरोधक युद्ध सहन करू शकत नाहीत. अनपेक्षित पणे काही सुदृढ आणि तरुण असलेल्या व्यक्ती सुद्धा या सायटोकाईन स्टॉर्मला बळी पडतात.

या सगळ्याचा परिपाक म्हणून फुफ्फुसाची आणि हृदयाची कायमस्वरूपी क्षमता कमी होण्याची (Lung  fibrosis , myocarditis ) शक्यता पण नाकारता येत नाही. कुठल्या व्यक्तीमध्ये हा आजार कसे वळण घेईल याबद्दल ठोकताळा बांधणे सध्यातरी कठीण आहे. म्हणून सरसकट सगळ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जाते.

मध्यम किंवा तीव्र स्टेज मधून संपूर्णतः सुधारणा झालेल्या काही जणांना या आजाराचे दूरगामी परिणाम भोगावे लागण्याची पण शक्यता असते.  

९) कोविड -१९ या विषाणू-वरती काहीच  इलाज नाहीये असं म्हणतात, हे खरं आहे का ?

AP & DW  – असं आहे बघा, कोविड -१९ च नाही तर इतर कुठल्याही आजारासाठी उपाययोजना साधारणतः चार प्रकारे विभागली जाते,  १) प्रतिबंध (prevention), २) क्युअर (cure ), ३) नियंत्रण (control ) व आधार (supportive) आणि  ४) उपशमन (palliation).

आजार होण्यापासूनच  रोखला जावा म्हणून प्रतिबंधात्मक उपाय असतात. कोरोना प्रतिबंधा-साठी शासन-दर्शित उपाय-योजना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेच. व्हॅक्सिन संदर्भात युद्धपातळीवर प्रयोग सुद्धा सुरु आहेत.

क्युअर म्हणजे डायरेक्ट विषाणू-नाशक औषधी. Fabipiravir आणि Remdesivir ही औषधे काही प्रमाणात कोरोनासाठी विषाणू नाशक म्हणून काम करतात अर्थात त्याला फार मर्यादा आहेत. ओव्हरऑल बघायचं झालं तर, कोरोना सोडून इतर बऱ्याच आजारांवरती सुद्धा क्युअर उपलब्ध नाहीयेत. किंबहुना काही विशिष्ट जंतुसंसर्गावरतीच डायरेक्ट इलाज उपलब्ध असतात. याचा अर्थ अश्या आजारांचा इलाज होतच नाही असे अजिबात नाही.  वैयक्तिक इम्युनिटी आणि त्याला सपोर्ट करणारी औषधे असे दोन्ही मिळून काम करत असतात.

नियंत्रण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. बहुतेक आजारांमध्ये शरीराला होणारा डॅमेज कंट्रोल करणे अत्यावश्यक असते. उदाहरण द्यायचे झाले तर , समजा काही अतिरेकी बॉम्बस्फोट करून पसार झाले तर त्यांना नुसतं पकडून किंवा मारून, स्फोटाने झालेले नुकसान भरून निघणार नाही.

स्फोटामुळे झालेल्या हानी साठी पण काहीतरी आपत्ती व्यवस्थापन ( disaster management ) करावे लागते.  त्याच-प्रकारे नुसते विषाणू मारल्याने पूर्ण फायदा होत नाही.  (आधी सांगितल्या प्रमाणे)  इम्युनिटी आणि विषाणू यांच्या युद्धात होणारे नुकसान सुद्धा मर्यादित करणे तितकेच महत्वाचे असते. यासाठी Tocilizumab, स्टिरॉइड्स, cytosorb इत्यादी औषधे वापरली जातात.

त्याशिवाय ताप, खोकला, अंगदुखी इत्यादी शारीरिक त्रास कमी करण्यासाठी PCM, व्हिटॅमिन , कफ सिरप दिली जातात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या पेशंटमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी होते त्यांना, ऑक्सिजन पुरवठा सतत सुरु ठेवावा लागतो.

रक्ताचं गुठळी होण्याचं प्रमाण वाढत असल्याने रक्त पातळ करणारी औषधे द्यावी लागतात. आधीच्या एखाद्या पूर्ण बऱ्या झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा (रक्तघटक ) देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. याद्वारे दुसऱ्या व्यक्तीमध्ये ऑलरेडी तयार असलेली प्रतिकार क्षमता आयती वापरता यावी यासाठी ही कल्पना पुढे आली आहे.

शेवटी ज्या रुग्णांची परिस्थिती अगदी जास्त हाता बाहेर गेलेली असते, अशा रुग्णांसाठी palliation म्हणजे थोडक्यात शेवटचा प्रयत्न म्हणून काही ऑप्शन्स वापरावे लागतात यामध्ये इंव्हेजीव व्हेंटिलेशन , ECMO (Extra corporeal membrane oxygenator), tracheostomy असे काही पर्याय असतात.

९) सौम्य किंवा मध्यम तीव्रतेच्या आजारावरती काय इलाज असतात ?

DW – सौम्य तीव्रतेच्या रुग्णांना hydroxychloroquine (HCQ), Fabipiravir आणि सपोर्टिव्ह औषधे दिली जातात आणि ऑक्सिजन-चे प्रमाण चेक करण्यात येते. आजार पुढे बळावण्याच्या शक्यतेकडे लक्ष दिले जाते. नशिबाने ९०% पेक्षा जास्त रुग्ण यात विशेष त्रास न होता बरे होतात.

मध्यम तीव्र गटामधल्या रुग्णांना फार जपावे लागते कारण अतिशय वेगाने कुठल्याही क्षणी अतिगंभीर परिस्थिती मध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते. फिजिओथेरपी , पोटावर झोपवून, ४५ अंशात बसते करून येनकेनप्रकारे त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून ऑक्सिजन चे प्रमाण वाढीस लागेल.

योग्य त्या वेळी विषाणू-नाशक औषधे आणि सायटोकाईन स्टॉर्म आटोक्यात आणणारी औषधे दिली जातात. उच्चदाबाने ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रे (HFNC , BiPAP) वापरून प्राणवायू चे योग्य प्रमाण राखले जाते. योग्य आणि वेळेवर इलाज झाल्यास ८०% च्या आसपास रुग्ण या परिस्थितीतून सहीसलामत बाहेर पडू शकतात.

सौम्य गटातील रुग्णाचा आजार बिघडत चालला आहे हे ओळखण्यासाठी अनुभवी तज्ज्ञाची गरज असते कारण सुरुवातीला पेशंटला स्वतःला फारशी लक्षणे जाणवत नाही आणि अचानक तब्येत ढासळायला लागते. त्यामुळे कोरोनाची शंका आल्यास अजिबात वेळ न दवडता तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.

१०) तीव्रता वाढलेल्या रुग्णामध्ये आणखी काही तपासण्या केल्या जातात का ?

AP – हो नक्कीच. रक्त तपासण्या (CBC, ESR, CRP, Ferritin, D dimer, IL 6 , RFT इत्यादी ) प्रामुख्याने केल्या जातात. या रिपोर्टवर तब्येत बिघडते आहे का याचा अंदाज लावता येतो आणि  ट्रीटमेंटने काही फरक पडतो आहे का याचाही अदमास घेता येतो. छातीचा एक्स रे , ABG (arterial blood gas) सुद्धा आजाराची प्रगती बघण्यासाठी जवळ जवळ दररोज केले जातात.

१० ) अतिगंभीर रुग्णांवर  काय इलाज केले जातात ?

AP -अतिगंभीर कोरोना न्यूमोनिया हा अतिशय चिंताजनक आजार आहे. उच्च दाबाने / प्रवाहाने प्राणवायू देऊन सुद्धा जेव्हा धाप लागणे कमी होत नाही. कमी ऑक्सिजन मुळे मेंदू, हृदय, किडनी वर परिणाम व्हायला लागतो तेव्हा परिस्थिती अतिगंभीर होते आहे असं समजलं जातं. श्वासनलिकेत नळी टाकून व्हेंटिलेटर (कृत्रिम श्वसन) सपोर्ट द्यावा लागतो.

सगळ्या प्रकारची औषधे (सायटोकाईन स्टॉर्म किंवा hyper-immune response आटोक्यात आणणारी) वापरली जातात. श्वासनलिकाछिद्र (tracheostomy) करण्याची गरज भासते. बरेच रुग्ण या फेज मध्ये इतर जिवाणूसंसर्गाला बळी पडतात. या स्टेज मधून वाचण्याची शक्यता फक्त ८-१० % असते.

कुठला रुग्ण या अतिगंभीर गटात जाईल याची शाश्वती देणे अवघड असते. कधी कधी इतर अनेक आजार असलेले  वयस्कर रुग्ण यातून बाहेर पडतात आणि सुदृढ तरुण व्यक्ती याला बळी पडतात. कोरोना संदर्भातील सगळी भीती ही या गटामुळे प्रकर्षाने जाणवते.

११) साधारणपणे किती कालावधी रुग्ण बरा होण्यास लागतो ?

DW – साधारणतः २ ते ३ आठवड्यांचा कालावधी रिकव्हरी ला लागतो जेव्हा आजार साधारण स्वरूपाचा असतो. अर्थातच अतिगम्भीर रुग्णांना कितीही दिवस लागू शकतात.

१२) रुग्ण बरा झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी ,पुन्हा कोरोना स्वाब निगेटिव्ह येणे गरजेचे असते का ?

AP -अजिबात नाही.  रुग्णाची प्रकृती स्थिरावली , बिना ऑक्सिजन , दम न लागता कमीत कमी ६ मिनिटे चालता येऊ लागले , ताप संपूर्ण उतरला, रक्ताचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले की बहुतेक रुग्ण बरे झाले आहेत असे ठरविता येते. कोरोना स्वाब टेस्ट करणे यात गरजेचे नाही. स्वाब टेस्ट कित्येक दिवस पॉजिटीव्ह राहू शकते (रुग्ण पूर्ण बरा झालेला असताना सुद्धा ) आणि साधारणतः २ आठवड्याने अशा रुग्णापासून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता पण नगण्य असते.

ज्या रुग्णामध्ये स्वाब टेस्ट कधीच पॉजिटीव्ह आलीच नाही अश्या व्यक्तीं मध्ये  IgG anitbody पॉजिटीव्ह येते. कोरोना विरोधात प्रतिकार क्षमता विकसित झाल्याचे हे द्योतक असते.

१३) ओके! हे सगळं मान्य.  पण कोरोनावर काही १००% इलाज नाहीये का ?

AP & DW – व्यक्ती तितक्या प्रकृती अशी आपल्याकडे एक म्हण आहे. वैद्यकीय दृष्ट्या त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीची शरीर-रचना , फिजिओलॉजी ही वेगळी असते. कुठलंही औषध किंवा इलाज हा ढोबळमानाने जास्तीतजास्त व्यक्तींना फायदा होतो आहे असा संख्याशात्रीय निष्कर्ष आल्याशिवाय वापरला जात नाही.

परंतु वापरात आल्यावर सुद्धा प्रत्येक डॉक्टरांना आपल्या रुग्णात दिसणारा प्रतिसाद हा वेगवेगळा असू शकतो. कुठलाही इलाज किंवा औषध हे सर्वसमावेशक असेल अशी अपेक्षा करणं हे कदाचित निसर्ग-नियमाविरुद्ध ठरेल.

उदाहरणार्थ तापासाठी देण्यात येणारी साधी पॅरासिटॅमॉल ची गोळी क्वचित काही जणांच्या यकृताला घातक ठरू शकते. याचा अर्थ पॅरासिटॅमॉल वापरू नये असा होत नाही, कारण अनेक वर्षांपासून लाखों लोकांना त्या गोळीचा फायदा झाला आहे/ होतो आहे. कोणत्या रुग्णामध्ये कुठल्या औषधाचे दुष्परिणाम होतील किंवा फारसा फायदा होणार नाही असा खात्रीलायक अंदाज प्रॅक्टिकली लावणे शक्य नाही. 

शरीर हे मानवनिर्मित मशीन नाहीये. शरीराच्या कामकाजाबद्दल मानवाला काही प्रमाणात समज आली आहे परंतु आपल्याला सगळं समजलं आहे असा दावा करणे म्हणजे निसर्गाची सूत्रे आपल्या हातात आहे असे म्हणणे होईल.

जे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे सध्या १०० % इलाजचा वायदा करणे म्हणजे भूल-थापा आहेत हे सुज्ञास सांगणे गरजेचे नाही.

१४) कोरोना हे थोतांड आहे याबद्दल आपले काय मत आहे ?

SF +AP + DW 

एखाद्या अघटित किंवा भयभीत करणाऱ्या घटनांचे आकलन नाही झाले की त्याला अंधश्रद्धेचे रुप देण्याचा कमजोर मनाचा सहाजिक प्रयत्न असतो. यामध्ये अनाठायी भीती किंवा कमालीची बेफिकिरी हे दोन्हीही भाग येतात. शास्त्रशुद्ध विचारसरणी असलेले मन मात्र घटनांचा खोलवर जाऊन तर्कसंगत विचार करते आणि त्या-संदर्भात ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. आणि तद-नुसार आलेल्या ज्ञानामुळे भीतीवर मात करण्यास मदत होते.

उदाहरण सांगायचे म्हणजे तीन शतकापूर्वी प्लेग या आजाराला परमेश्वराचा कोप , धर्माचा अवमान केल्याने होणारी अवकृपा  समजले जात होते. पण पुढे चालून, काही तर्किकबुद्धी शास्त्रज्ञांनी त्यामागे  Yersenia pestis नावाचे जिवाणू असतात आणि त्यांच्यावर प्रतिजैवके उपयोगी पडतात वगैरे असा शोध लावला.

अश्या असंख्य शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नाने प्लेग, स्मॉल पॉक्स, पोलिओ  सारखे अनेक आजार आज हद्दपार झाले आहेत किंवा त्यावर ठोस उपाय उपलब्ध आहेत. त्यांना अनेक विरोध झाले पण शेवटी हे सगळे शक्य झाले कारण काही सामान्य लोकांनी या  विज्ञानाधिष्टीत विचारसरणीला महत्व दिले. कुठल्याही विज्ञानाला लोकाश्रयाची तितकीच गरज असते.

अर्थात, आज जग पुढे चालले आहे तरी अ-शास्त्रीय विचारांचा ऱ्हास झालेला नाहीये. आलेल्या आपत्तीस इतर जबाबदार आहेत किंवा फक्त आपणच त्यात बळी आहोत किंवा असे काही नाहीच या खोट्या आनंदात राहणे ह्या तर्कभ्रष्ट वल्गना आहेत.

त्यामुळे येणाऱ्या काळात लिहिल्या जाणाऱ्या जगाच्या इतिहासात, आपण सायंटिफिक विचारांचे समाज-भाग होतो की अतर्किक अनागोंदी (chaos) करणाऱ्या गर्दीचे,  हे ठरवणे, प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आहे, ऐच्छिक बाब आहे यात शंका नाही.

कृपया नोंद घ्यावी

१. कोव्हीडोलोजी (Covidology) हे अजून उलगडत जाणारे शास्त्र आहे. भविष्यात होणार्या संशोधनानुसार इलाज-प्रणालीत महत्वाचे बदल होणे अपेक्षित आहेत. त्यामुळे प्रस्तुत लेखातील माहिती ही फक्त आत्ता-पुरती सत्य आहे. परंतु त्यात नक्कीच आमूलाग्र बदल घडत राहतील.

२. प्रस्तुत माहिती जन-सामन्यासाठी आहे. यात कुठलाही विशिष्ट ट्रीटमेंट प्रोटोकॉल सुचवण्याचा प्रयत्न नाहीये.

३. या लेखाचा एकमेव उद्देश कोविड -१९ आणि त्याच्या इलाजाबद्दल विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित व्हावा असा आहे.

४.कोविड संदर्भात सगळी माहिती इंग्रजीत उपलब्ध असल्याने, मराठीतून भाषांतर करताना काही अनपेक्षित चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मनापासून क्षमस्व आहो.

लेख मनाला पटल्यास आपल्या मित्र-नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करावा, ही विनंती. 

डॉ.समीर फुटाणे

Source From WhatApp Post.

About Sac Jag

I am SACHIN, (Microsoft.Net Developer) I am working on technologies like C#.Net, ASP.NET, Crystal Report etc. Through this blog, I am trying to sharing good information which I have been learned every day related to the moultiple topic. Thanks!

View all posts by Sac Jag →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *